
बुलढाणा जिल्ह्यात..जळगांव जामोद तालुक्यात येत असलेल्या, चालठाणा येथील एका ५३ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना, दिनांक ९ जुलै रोजी घडली. चालठाणा येथील ५३ वर्षिय शेतकरी तुळशीराम लक्ष्मण धुर्डे यांची चालठाणा शेत शिवारात गट नंबर ५-६ मध्ये १ हेक्टर शेती असून त्यामध्ये त्यांनी पूर्ण कपाशीची लागवड केली होती. त्यांच्यावर जामोद येथील विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे, १ लक्ष ६० हजार रुपयांचे कर्ज होते. तसेच शेतीत काहीच उत्पन्न मिळत नसल्याने व सततची नापीकी, यासह मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेले पिकाचे नुकसान, यामुळे खचून गेलेल्या या शेतकऱ्याने बँकेचे काढलेले कर्ज कसे भरावे या विवेचनेतून, हताश होऊन कपाशी पिकावर फवारण्यासाठी आणलेले विषारी औषध, शेतातच प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा व तीन मुली असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. चालठाणा येथील तुळशीराम धुर्डे हे गावांमध्ये त्यांच्या शांत संयमी स्वभावाने परिचित होते. त्यांच्या या अकाली जाण्याने संपूर्ण चालठाना गावावर शोककळा पसरली आहे.



