
“छत्रपती शिवरायांची जयंती नाचून नाही, तर वाचून आणि त्यांचे विचार आत्मसात करून साजरी करा!” हा सकारात्मक संदेश देत जळगाव जामोद येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने यंदाही वैचारिक मेजवानीचे आयोजन केले आहे. गेल्या ७ वर्षांपासूनची आपली गौरवशाली परंपरा कायम राखत, यावर्षी नामवंत तृतीयपंथी समाजसेविका श्रीमती शमिभा पाटील यांचे जाहीर शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. जळगाव जामोदची शिवजयंती ही केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता, ती एक प्रबोधन पर्व म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र स्तरावरील अनेक नामवंत व्याख्यात्यांनी आजवर या व्यासपीठावरून शिवरायांचा इतिहास मांडला आहे. सर्व धर्म आणि अठरा पगड जातींच्या नागरिकांना सोबत घेऊन चालणारी ही समिती शहराच्या एकात्मतेचे प्रतीक बनली आहे. यावर्षीचा हा मुख्य सोहळा दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता दुर्गा चौक, जळगाव जामोद येथे प्रमुख वक्त्या श्रीमती शमिभा पाटील, प्रसिद्ध समाजसेविका व शिवव्याख्यात्या ह्यांच्या व्याख्यानातून संपन्न होणार आहे. शिवरायांचे कार्य आणि त्यांचे प्रशासन आजच्या पिढीला समजण्यासाठी अशा व्याख्यानांची गरज आहे. तरी या सोहळ्याला सर्व शिवप्रेमी, महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, जळगाव जामोद यांच्या वतीने करण्यात आले आहे.



