
बुलढाणा जिल्ह्यात, जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव येथील मनोहर मारोती वंडाळे (वय ३८) या तरुण शेतकऱ्याचे विषारी सापाच्या दंशामुळे उपचारादरम्यान खामगाव येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे सुनगांव परिसरात शोककळा पसरली आहे.
मनोहर वंडाळे हे काल, १५ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देत होते. याच वेळी त्यांना विषारी सापाने पायाला दंश केला. शेतात असलेल्या नातेवाइकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जळगांव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात नेले.
मात्र, जळगांव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील लस (Anti-venom) उपलब्ध नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे ‘रेफर’ करण्यात आले. त्यामुळे मनोहर वंडाळे यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रात्री उशिरा नऊ वाजता सुनगांव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण सुनगांव गावावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. मनोहर वंडाळे यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा मोठा आप्त परिवार आहे.



