
बुलढाणा जिल्ह्यात खामगांव येथे…नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक पोलीस अधिकारी पैशांसाठी आपल्या खाजगी कारने पाठलाग करून वाहनधारकांना विनाकारण अडवून कारवाईचा धाक दाखवून पैशांची मागणी करत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. दरम्यान या व्हिडिओची जिल्हा पोलीस अधिक्षकांनी गंभीरतेने दखल घेत सदर कर्मचाऱ्याला..

खामगाव येथील कंट्रोल रूममध्ये अटॅच करण्याचे आदेश दिले. खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले एएसआय सुभाष रिढे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा पाठलाग करून, त्यांना अडवून पैशासाठी त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. दरम्यान एका ट्रक चालकाने सदर पोलीस अधिकाऱ्याचा, ट्रकचा पाठलाग करत असतानाचा व्हिडिओ तयार करून व्हायरल केला होता. या व्हायरल व्हिडिओची दखल घेत जिल्हा पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांनी एएसआय सुभाष रिंढे यांना तात्काळ खामगाव येथील कंट्रोल रूमला अटॅच करण्याच्या सूचना खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव वाघ यांना दिल्या. त्यावरून वाघ यांनी सदर कर्मचाऱ्याला काल रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खामगाव कंट्रोल रूम ला सलग्न करण्याचे आदेश काढले.



