
बुलढाणा जिल्ह्यात जळगांव जामोद तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सूनगाव येथील स्मशानभूमीची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. सूनगाव ते जामोद रोडवर खानी नदीजवळ असलेल्या या स्मशानभूमीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे चित्र असून, शासनाचा निधी उपलब्ध असतानाही ही निंदनीय अवस्था कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या स्मशानभूमीवरील टीन पत्रे तुटलेल्या आणि उडालेल्या अवस्थेत आहेत. सद्यस्थितीत शेडवर एकही पत्रा शिल्लक नसल्याने स्मशानभूमीला उघड्या मैदानाचे स्वरूप आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
स्मशानभूमीच्या या दुरवस्थेमुळे सूनगाव येथील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: पावसाळ्यात पत्रे नसल्यामुळे पावसात सरण भिजते, परिणामी अंत्यसंस्कारात अडथळे येतात.
उन्हाळ्यात कडक उन्हात सावली नसल्याने उपस्थित नागरिकांचे हाल होतात. वादळी वाऱ्यामुळे स्मशानभूमी वरील उरलेले टिनपत्रेही उडून गेल्यास येथे फक्त सांगाडा उरणार.
एकीकडे गावच्या विकासासाठी लाखो रुपयांचा निधी येत असताना, दुसरीकडे मूलभूत सुविधेचा भाग असलेल्या स्मशानभूमीची दुरुस्ती का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सूनगाव ग्रामपंचायत नागरिकांना किमान सुविधा पुरविण्यातही अपयशी ठरत असल्याची भावना सध्या जनमानसात उमटत आहे.
“स्मशानभूमीची अवस्था अत्यंत बिकट आहे. अंत्यसंस्कारासारख्या गंभीर प्रसंगीही लोकांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. ही गावाची शोकांतिका असून ग्रामपंचायतीने याचे गांभीर्य ओळखावे.” व स्मशानभूमीची ही दुरवस्था पाहता, ग्रामपंचायत प्रशासनाने वेळकाढूपणा थांबवून तात्काळ नवीन टीन पत्रे बसवावेत आणि स्मशानभूमीची डागडुजी करावी, अशी आग्रही मागणी सूनगाव येथील नागरिकांनी केली आहे. जर ही मागणी मान्य झाली नाही, तर ग्रामस्थ आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.



