
बुलढाणा जिल्ह्यात जळगांव जामोद तालुक्यातील गोमाल येथील साथरोग थांबायचे नाव घेईना..मृतांचा आकडा चार वर गेला, अशातच तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुनगांव येथे संपूर्ण गावभर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत आहे. त्यामुळे सूनगांव वासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सूनगांव ची वाटचाल सुद्धा गोमालच्या दिशेने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामपंचायत चा कारभार हा गेल्या काही महिन्यांपासून हम करे सो कायदा याप्रमाणे सुरू असून नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता वार्ड क्रमांक चार मधील रस्त्याची जेसीबी द्वारे खोदाई व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फुटलेली ग्रामपंचायत ची पाणीपुरवठा योजनेची पाईप लाईन व नागरिकांना देण्यात आलेले नळ कलेक्शनचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या खोदलेल्या रस्त्यावर फुटलेल्या पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत असुन येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात जाण्या येण्याचाही त्रास होत आहे. तसेच जमा झालेले दूषित व गढूळ पाणी परत पाईप लाईन मध्ये जाऊन ते पाणी नळाद्वारे येथील नागरिकांना मिळत असून या दूषित पाण्यामुळे येथील नागरिक तसेच लहान मुलांना सुध्दा त्वचा विकारासह पोटाचे आजार मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत.


गेल्या दहा ते बारा दिवसापासून वार्ड क्रमांक चार मधील पाईपलाईन फुटलेली आहे. त्यामुळे येथील महिला काल दिनांक 19 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात यासंबंधीत जाब विचारण्याकरिता मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. यावेळी येथील महिलांनी झालेल्या नुकसानीची भरपाई व रस्ता दुरुस्तीसह पाणीपुरवठा पाईप लाईन दुरुस्त करून स्वच्छ पाण्याची मागणी केली आहे. येथील महिलांनी आपल्या लहान मुलांच्या अंगावर दूषित पाण्यामुळे होत असलेले त्वचेचे विकार दाखविले.
ह्या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने..ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात जमले होते व आक्रमकरीत्या ग्रामपंचायत वर रोष व्यक्त करीत होते.
________________________________
ग्राम विकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष…सुनगांव येथे काही दिवसापूर्वी शेकडो महिलांनी शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासठी ग्रामपंचायत वर घागर मोर्चा आणला होता. त्यावेळी महिलांनी ग्राम विकास अधिकारी हितेंद्र जोशी यांना चांगले धारेवर धरले. सध्या लिकेज पाईपलाईन मधून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. हे साथ रोगाला निमंत्रण आहे. तेच गलिच्छ पाणी ग्रामस्थांना प्यावे लागते. ग्रामसेवक मात्र वेळकाढू धोरण अवलंबतात. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी यांना पंचायत समिती प्रशासनाने समज देणे गरजेचे आहे.



